हिंगोली- नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला होता. खबरदारी म्हणून प्रशासनाच्यावतीने त्याचा मृतदेह हा जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला होता. मृत सफाई कर्मचाऱ्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता, आज त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हिंगोली नगरपालिकेने सुटकेचा श्वास सोडला आहे.
सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. नगरपालिकेचे कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत एका सफाई कर्मचाऱ्याचा अचानकपणे मृत्यू झाला. त्यामुळे नगरपालिकेच्यावतीने खबरदारी घेत सदरील मृतदेह हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला होता. त्याचा स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला होता. ती व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल आज हिंगोली प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
सदरील व्यक्तीचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे नगरपालिका तसेच प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. खबरदारीचा उपाय म्हणून हिंगोली नगरपालिकेच्यावतीने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घराच्या परिसरात आरोग्य कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवून होते अशी माहिती मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितली. दिवसेंदिवस हिंगोली जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने हिंगोलीकरांची चिंता वाढत आहे.