हिंगोली - आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या योजना असूनही हिंगोलीतील एका तरुणाला मात्र या योजनांचा लाभ होत नसल्याने तो अंथरुणाला खिळून बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातील मन्नास पिंपरी येथे ही घटना घडली आहे. नामदेव पांडुरंग सुतार असे या तरुणाचे नाव आहे. नामदेव यांना गेल्या सहा वर्षांपासून ह्रदयाचा त्रास आहे. त्यांचे ह्रदय केवळ वीस टक्केच काम करत असल्याचे डॉक्टरांच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याना ह्रदय प्रत्यारोपण करण्यासाठी डॉक्टरांनी 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च येत असल्याचे सांगितले आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने एवढा मोठा खर्च करायचा कसा ? हा प्रश्न वडिलांना व मुलाला पडला आहे. जवळपास सहा वर्षांपासून मुलगा अंथरूनाला खिळून पडला आहे. वडीलही अपंग आहे. नामदेवला ऑक्सिजनची तर नियमित गरज आहे. मात्र हा खर्च परवडणारा नसल्याने वाशिम येथील खाजगी डॉक्टर गोपाल ठाकरे यांनी ऑक्सिजनची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली आहे. शिवाय उपचार देखील नाममात्र शुल्क मध्ये केले जात असल्याचे वडील पांडुरंग सुतार यांनी सांगितले.
हिंगोली ह्रदय ट्रान्स्फर रुग्ण ह्रदय प्रत्यारोपण नामदेव यांनी हैदराबाद येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात तपासणी केली तेव्हा त्यांचे ह्रदय केवळ 27 टक्के काम करत असल्याचे तपासणीत आढळून आले. ह्रदय प्रत्यारोपण करण्यासाठी व इतर असा एकूण 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र पैसा उभा करण्याची परिस्थिती नसल्याने त्यांना उपचार न घेता घरातच बसावे लागत आहे. पुढाऱ्यांनी दिले शिफारशीचे पत्र नामदेव यांची बिकट परिस्थिती पाहून हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधानाकडे शिफारस केली व कळमनुरी विधानसभा आमदार संतोष बांगर एका संस्थेकडे शिफारस केलीय. फडे व टोपल्या बनवण्यातून जो पैसा मिळत आहे, तो सर्व नामदेव यांच्या उपचारासाठीच खर्च होत आहे. त्यामुळे घरात दारिद्र्याची स्थिती निर्माण झालेली आहे. आरोग्य योजना ठरत आहेत कुचकामी सरकार तर्फे वेगवेगळ्या आरोग्य योजना राबवल्या जातात. मात्र कुठल्याच योजनेत नामदेवचा आजार बसत नसावा का? असा सवाल नामदेवचे कुटुंब करत आहे. त्यामुळे ह्रदय प्रत्यारोपणाचा खर्च सरकारच्या कोणत्या तरी योजनेतून व्हावा अशी मागणी कुटुंबाने केली आहे.हेही वाचा - रात्र संचारबंदीचा पहिला दिवस; पाहा मुंबईचा ग्राऊंड रिपोर्ट..