हिंगोली - जिल्ह्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरिपाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात 236 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर सेनगाव तालुक्यातील गिलोरी येथे वीज पडून एक बैल दगावल्याची घटना घडली. दरम्यान, वसमत तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून कुरुंदा आणि टेम्भुर्णी येथे अतिवृष्टी झाली आहे.
शेतकऱ्याला खरिपाच्या पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे शेतजमिनीतून पाण्याचे पाट वाहू लागले. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कनेरगाव, माळधामणी, माळसेलु, हिंगोली शहरातील कमला नगर या ठिकाणी रेल्वे पूला खाली साचले होते. याकारणाने पूलावरील वाहतूक काही काळा करिता खोळंबली होती.
वीज पडून बैल दगावला -
सेनगाव तालुक्यातील गिलोरी येथे, वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला. शेतकरी सुरेश लोडे यांनी पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने, कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच, पेरण्या करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात 3 लाख 84 हजार हेक्टर पैकी सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होतो.
- हिंगोली -
हिंगोली - 38, खांबाळा - 35, माळहीवरा - 53, सिरसम बु -53, बसांबा - 38, नरसी नामदेव - 28, डिग्रस - 12
- कळमनुरी
कळमनुरी - 66, नांदापूर -61, आ. बाळापूर - 19, डोंगरकडा - 3, वारंगा फाटा - 24, वाकोडी - 31
- सेनगाव
सेनगाव - 6, गोरेगाव - 42, आजेगाव - 11, साखरा - 6, पानकनेरगाव - 5, हत्ता - 19.
- वसमत
वसमत - 55, हट्टा - 55, गिरगाव - 18, कुरुंदा - 77, टेम्बुर्णी 81, आंबा - 35, हयातनगर - 82
- औंढा नागनाथ -
औंढा नागनाथ - 44, जवळा बाजार - 64, येहळेगाव - 63, साळणा - 65