हिंगोली - जिल्ह्यात बळीराजा खरिपाच्या पेरणीसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. पेरणी पूर्व मशागतीची कामे आटोपून घेण्यासाठी शेतकरी अहोरात्र परिश्रम घेत आहे. अशात जिल्ह्यात सलग दोन दिवस हजेरी लावलेल्या पावसाने बळीराजाच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे शेतकरी आता हळद लावगडीसाठी सज्ज झाला आहेत. लावगड वेळीच व्हावी म्हणून शेतकरी ट्रॅक्टरचा आधार घेत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात शेतकरी गेल्या काही दिवसांपासून पेरणी पूर्व मशातीची कामे गतीने करून घेत आहेत. अजून ही शेती नीट करणे, नांगरणी, वखरणी, रोटावेटर आदी कामे ही ट्रॅक्टरच्या साह्याने करून घेत आहेत. आता शेतातील सर्वच कामे ट्रॅक्टरने होत असल्याने शक्यतो बैलजोडीच्या साह्याने शेतीची कामे करून घेण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवत आहे. ट्रॅक्टरला सर्वाधिक जास्त मागणी असल्याने ट्रॅक्टरचे भाव देखील वाढले आहेत. मात्र, वेळेतच काम पूर्ण होत असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरला सर्वाधिक जास्त पसंती देत आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये सलग दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळद लागवडीसाठी सुरुवात केली आहे.
24 तासात एवढ्या पावसाची झाली नोंद -
जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 27.00 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 57.20 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 7.19 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पावसाची नोंद -
हिंगोली | 20.90 (37.80) मि.मी. |
कळमनुरी | 18.70 (78.70) मि.मी. |
सेनगाव | 32.50 (38.20) मि.मी. |
वसमत | 26.70 (69.50) मि.मी. |
औंढा नागनाथ | 42.20 (65.50) मि.मी. |
जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 57.20 मी. मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.