हिंगोली - शहरात सोमवारी झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पार पडली. जो काही प्रकार घडला ती दंगल नव्हती, काही जणांकडून दंगल दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अफवा पसरवल्या जात आहेत. याला नागरिकांनी बळी पडू नये. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
या प्रकारात काही निरापराधांवर लाठीचार्ज झाला त्याबद्दल प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिलगिरी व्यक्त केली. हिंगोली येथे दोन गटांमध्ये सोमवारी वाद झाला होता. घडलेली परिस्थिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी शांतता समितीच्या बैठकीत सांगितली. ते म्हणाले, "वाद चांगलाच विकोपाला जाणार होता. मात्र, पोलीस प्रशासनाच्यावतीने हा वाद नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले गेले. आणि परिस्थिती आटोक्यात आली. एवढेच नव्हे तर आय. जी. प्रकाश मुकत्याल यांनी शहरातील परिस्थितीची पाहणी केली. चुका झालेल्या ठिकाणी समजावून देखील सांगितले. तसेच दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आमच्याच पोलीस कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई देखील केली. तसेच जे काही व्हायरल व्हिडिओ झालेत त्यात दोषी दिसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर ही कारवाई केली जाणार आहे."
ज्यानी दगड फेक केली त्यांनी स्वतः हून पोलीस ठाण्यात हजर व्हावे किंवा व्हिडिओमध्ये दिसणाऱ्याना त्यांच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात हजर रहावे. पोलीस प्रशासनावर आरोपीला जबरदस्तीने आणण्याची वेळ येऊ देऊ नये. त्याच बरोबर सध्या समाज माध्यमावर भडकाऊ पोस्ट फिरवल्या जात आहेत त्या थांबविण्यात याव्यात. कोणतीही पोस्ट व्हायरल करताना अगोदर तिची चाचपणी करावी. बऱ्याच जणांनी शहरातील परिस्थिती नियंत्रणात आल्याचे मेसेज केल्याने त्यांचे आभार मानले. आता सण समारंभ आहेत त्यामुळे कोणी वादग्रस्त गोष्टी करणार नाही याची काळजी घ्यावी. निरापराधावर गुन्हा दाखल केला जाणार नाही, याची खबरदारी पोलीस प्रशासन घेत आहे, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रुचेश म्हणाले, सणसमारंभात शांतता प्रस्थापित करावी. कालची घटना दंगा दाखवण्याचा प्रयत्न होता, मात्र दंगा काय असतो तो मी स्वतः अनुभवला आहे. हिंगोलीतली घटना ही दंगा नव्हती, यापेक्षा मोठ्या घटना घडलेल्या आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. या घटनेला अजिबात मोठे करू नका जात धर्म काही नाही आपण सर्व एक आहोत. कोणी अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. मुख्य म्हणजे महत्वाचा उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या उत्सवाचे स्वागत आता शांततेत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.
बैठकीस उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सीओ रामदास पाटील, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर रेड्डी, पोनि, अशोक घोरबंड यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.