हिंगोली - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक रिंगणात असलेले हेमंत पाटील यांच्यावर विरोधी पक्ष धुळ्याचे पार्सल म्हणून टीका करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना हेमंत पाटील यांनी म्हटले, की मी कुठे जन्मावे हे काय माझ्या हातात नाही. विरोधक उलट-सुलट खोट बोल पण रेटून बोल अशी भूमिका घेत आहेत. विरोधक मतदारांना संभ्रमात पाडत असल्याची टीकाही त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना विरोधकांवर केली.
जिल्ह्यात अनेक विकासाचे मुद्दे आहेत, माझे सर्वप्रथम त्याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे विरोधक काय बोलतील याकडे लक्ष न देता, जिल्ह्याचे 'नाउद्योग जिल्हा' हे नाव कसे पुसता येईल यावर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे विरोधकांनीही यापूर्वी याच पक्षात सत्ता भोगलेली आहे. त्यामुळे त्यानींही खोटी दिशाभूल करू नये, असेही महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत रिंगणात असलेले सर्वच उमेदवार हे आयात केलेले आहेत. सर्वांनाच मतदार किती पसंती देतील हे देखील येणारा काळच ठरविणार आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आलेला सिंचन प्रश्न सोडवण्यासाठी तयार असले तरी तिन्ही उमेदवार हे नांदेड जिल्ह्यातील असल्याने मतदार यांच्या आश्वासनास बळी पडतील काय? तसेच हे उमेदवार नांदेडचे असल्याने त्यांचा जिल्ह्याच्या विकासासाठी काय उपयोग होणार? विषेश म्हणजे जिल्ह्यात आयात केलेल्या उमेदवारांमुळे जिल्ह्यात खदखद सुरू आहे.