हिंगोली - जिल्ह्यातील काही भागात आज (रविवार) मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली शहरात पावसाचा वेग अधिक होता, त्यामुळे सर्वत्र पाणी साचल्याचे पहायला मिळाले. सध्या शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, पावसामुळे शेतीच्या कामना ब्रेक लागणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसापासून वातावरणामध्ये बदल जाणवत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तौक्ते चक्रीवादळामुळे देखील हवामानात बदलाचा प्रत्येय येऊ लागला आहे. अचानकपणे पावसाला सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहरामध्ये पावसाचा वेग सर्वाधिक होता, तर ग्रामीण भागात पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. सध्या शेतकरी शेतीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. पेरणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने, मृग नक्षत्र लागण्यापूर्वी शेतातील कामे ट्रॅक्टर तसेच बैलजोडीच्या साह्याने गतीने करून घेत आहेत. मात्र, अचानक हजेरी लावलेल्या पावसाने शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे.
हेही वाचा -Cyclone Tauktae : सिंधुदुर्गात तौत्के चक्रीवादळाचे थैमान, महामार्गावरील अपघातात एकाच मृत्यू