हिंगोली - जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे आसोलवाडी परिसरात ओढ्याला आलेल्या पुरात पती-पत्नी वाहून गेले आहेत. कळमुनरी तालुक्यात ही घटना घडली. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली. मात्र, बैल पोहोत बाहेर निघाले. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू आहे.
कुंडलिक गोविंदा आसोले (वय - 50), धुरपताबाई कुंडलिक आसोले (वय - 55, दोन्ही रा. आसोलवाडी ता. कळमनुरी) असे दोघा पती-पत्नीचे नाव आहे. ते शिवसेना गट नेता अप्पाराव शिंदे यांच्याकडे सालगडी म्हणून कामाला आहेत. ते शेतातील आखाड्यावर राहतात. ते बैलगाडीद्वारे कळमनुरी येथे दळण दळून आणण्यासाठी गेले होते. तेथे या महिलेने बांगड्या भरल्या. यानंतर शेतात जायला निघाले.
पाऊस सुरू असल्याने घाई घाई शेताकडे जात होते. कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या विकास नगर जवळील भुडकी नाल्यातील पाण्याचा अंदाज आला नाही. यानंतर ते वाहून गेले. बैल नाल्यातून बाहेर निघाले. मात्र, दोघे पती-पत्नी वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोनि रंजित भोईटे हे पथकास घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते. मात्र, दोघे ही मिळून आले नाही. अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले आहे. मात्र, नातेवाईक हे ओढ्याच्या काठावर बसून होते. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.