हिंगोली - पांदण(कच्चा) रस्ता बनवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील अद्याप काम अपूर्ण आहे. सतत मागणी केल्यानंतरही रस्त्याच्या कामाचं घोडं अडलंय. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी गाढवाचा वापर करून खतं आणि बी-बियाणे शेतात पोहोचवली आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांन सतत शेतात जावे लागते. मात्र कच्च्या रस्त्यावरून देखील ओढ्याचे पाणी वाहत असल्याने या ठिकाणी पक्क्या रस्त्याची मागणी होत आहे. हिंगोली तालुक्यातील खेरडा वाडीतील शेतकऱ्यांवर गाढवं चालवत नेण्याची वेळ आली आहे.
ग्राम सडक अभियानाअंतर्गत गावांपर्यंत रस्ते नेण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आल्या. मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये काही वर्षांपूर्वी बांधलेल्या रस्त्यांची आता चाळण झाली आहे. ग्रामस्थांवर चालत आणि सायकल घेऊन जाण्याची वेळ आली आहे. खेरडा वाडी येथे शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी गाढवांच्या पाठीवर खतांची आणि बियाणांची पोती वाहिली आहेत.
यात सेनगाव तालुक्यातील हाळदवाडी, तर कळमनुरी तालुक्यातील कारवाडी, मळई रस्ते नसलेल्या या गावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आजही असेच इतरही गावातील रस्त्यांची अवस्था झालेली आहे. कारवाडी या गावाचा तर प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. आज ही या गावातील ग्रामस्थांना यातना भोगण्याशिवाय पर्याय नाही. त्या पाठोपाठ आता साडे तीन हजार लोकसंख्या असलेल्या खेरडा वाडी येथील शेतकऱ्यांना पांदण रस्ता झालेला नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या पांदण रस्त्याच्या पलीकडे जवळपास दिडशेच्या वर शेतकऱ्यांची शेती असल्याचे एका शेतकऱयाने सांगतले.
तसेच हा पांदण रस्ता आडगाव मुटकुळे या गावाला जोडला जात असल्याने या ठिकाणाहून विदर्भात जाणे सोपे होऊ शकते.
मात्र तो दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाचं घोडं अडकलंय. भांबावून गेलेले शेतकरी गावात जो पुढारी येईल, त्याकडे या रस्त्याची मागणी करतात. मात्र प्रत्येक पुढारी ही वेळ मारून नेत होकार दर्शवत असल्याचे त्रस्त शेतकरी सांगत आहेत. दरवर्षीच्या पावसात या रस्त्यावर चालता देखील येत नाही. यंदा मुसळधार पावसामुळे या पांदण रस्त्याने जाण्यात आणखी अडचणी वाढल्या आहेत. तसेच गावातील रस्त्यालगत असलेल्या शेत शिवाराची पेरणी झाल्यावर काहीवेळा ट्रॅक्टर मालक या भागात पेरणी करण्यासाठी येतात. नंतर खुरपणीच्या वेळेस देखील मजुरांना कधी 50 तर कधी 100 रुपये वाढवून मजुरी द्यावी लागते.
मजूर आले तर ते मुक्काच्या तयारीने येतात. कारण या पांदण रस्त्यावरून वाहणाऱ्या ओढ्याला पूर येतो. पूर ओसरण्यापर्यंत संपूर्ण रात्र जाते. त्यामुळे बरेच लोक या भागात मुक्काम करतात.