हिंगोली - मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील कुरुंदा येथील टोकाई गडावर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस झटत पर्यावरणप्रेमी विविध प्रकारची वृक्ष लागवड करत आहेत. गडाला नंदनवन बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथे प्रत्येक सण साजरा केला जातो; तेही वृक्ष लागवडीच्या माध्यमातून!
यंदाच्या गणेशोत्सवात कुरुंद्यात झाडाच्या खोडापासून आकर्षक गणरायाची मूर्ती साकारण्यात आली असून प्रसाद म्हणून रोपटं वाटण्यात येत आहेत. प्रसादरुपी वाटलेल्या रोपाची गडावर लागवड करून त्याची जबाबदारी देखील स्वीकारण्यात येत आहे. त्यामुळे येथे हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड झालेली आहे. तर वृक्षांची देखील संख्या वाढत आहे.
हिंगोलीतील कुरुंदा येथील डोकाई गडावर सह्याद्री देवराई वृक्षप्रेमी यांच्यावतीने सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे वृक्ष लागवड केली जात आहे. एवढेच नव्हे, तर येथे सयाजीराव शिंदे यांनी एक दोन वेळा भेट देऊन वृक्ष लागवडीची पाहणी देखील केली होती. प्रत्येक सण उत्सव येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री देवराई परिवार व पर्यावरण प्रेमी यांच्यावतीने गणेशोत्सवात झाडाच्या खोडापासून पर्यावरण पूरक गणपतीची मूर्ती उभारलेली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून पर्यावरण प्रेमी या टोकाई गडावर आवर्जून हजेरी लावत आहेत.
या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पर्यावरणप्रेमीला प्रसाद म्हणून वृक्षाचे रोप आणायला सांगितले जात आहे. या रोपींची परिसरात लागवड करण्यात येत आहे.
आज अक्सिजनची नितांत गरज आहे. प्राणवायू हे केवळ झाडं देऊ शकतं. ऑक्सीजनच नसेल तर आपलं जीवन हे काही क्षणात संपते. एवढेच नव्हे तर या झाडापासून आपल्याला पाणीदेखील मिळते. शिवाय, भर उन्हामध्ये झाड हे आपल्याला उन्हापासून सावली देखील देण्याचा प्रयत्न केला, असे सयाजी शिंदे यांनी ईटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले होते. यासाठी त्यांनी राज्यभरात 'झाडे लावा,झाडे जगवा' या संकल्पनेला पाठिंबा देत त्यासाठी प्रयत्न करत आहेत.
झाडांची सेवा करण्याचा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या गडावर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाडे लावण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. या गडावर प्रत्येक कार्यक्रम हा वृक्षलागवडीच्या माध्यमातून केला जातो. गडाला नंदनवन करण्याचा उद्देश त्यामागे आहे. या गडाकडे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पुढाऱ्यांचे देखील असे बारकाईने लक्ष आहे. हे स्वतः अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी तसे बोलूनही दाखवले आहे. त्यामुळे येत्या काही काळामध्ये खरोखरच या टोकाई गडावर विविध जातींची वृक्ष लागवड केल्याने नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या गडावर पर्यावरणप्रेमी अनेक झाडांच्या रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करत आहेत. यंदा गणेशोत्सवात प्रसाद म्हणून वृक्षांची रोपं मागितली जात असल्यामुळे अजून येथे झाडांची संख्या ही हजारोच्या संख्येने वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.