हिंगोली - प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये अजून चार जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे सर्वजण मुंबई येथून हिंगोली जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. या रुग्णांमध्ये एका 14 वर्षीय मुलाचाही समावेश आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे. आज(गुरुवार) प्राप्त झालेल्या अहवालात 14 वर्षीय मुलाचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जिल्ह्याची संख्या ही 237 वर पोहोचली असून 201 जण हे बरे झालेले आहेत. तर, विविध रुग्णालयात 36 जणांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.
आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये हिंगोली तालुक्यातील लिंबाळा येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल केलेल्या दोन व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यातील एक २३ वर्षीय व्यक्ती हा मुंबई येथून हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथे दाखल झाला, तर दुसरा 14 वर्षीय मुलगा हा कनेरगाव नाका येथे आलेला आहे. तसेच वसमत येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या 24 वर्षीय पुरुषाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती हा मुंबई येथून वसमत शहरातील बुधवार पेठ येथे दाखल झाला होता. तो जेव्हापासून हिंगोली जिल्ह्यात आला आहे तेव्हापासून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याला शासकीय सेंटरमध्ये ठेवले होते. त्याचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याचबरोबर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 येथील एका जवानाला कोरोनाची लागण झालेली आहे. सदर व्यक्ती मुंबईमधून जिल्ह्यात दाखल होताच त्याला कळमनुरी तालुक्यातील बाळापूर येथून काही अंतरावर असलेल्या एसएसबी यलकी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले होते. त्याचादेखील अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नव्याने आलेले सर्वच कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी विविध कोरोना वार्डमध्ये हलविण्यात आलेले आहेत.
तर, कळमनुरी कोरोना केअर सेंटर अंतर्गत बऱ्या झालेल्या एका रुग्णाला प्रशासनाच्या वतीने डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकंदरीतच जिल्ह्यामध्ये नव्याने चार रुग्ण आढळल्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 237 वर पोहोचला आहे. त्यापैकी 201 रुग्ण हे बरे झालेले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सध्याच्या स्थितीमध्ये एकूण 36 रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटर तसेच कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती हिंगोली प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.