हिंगोली - एकाच वर्षात शाळेच्या गणवेशात तीन वेळा बदल केल्याचा शहरातील अनुसया विद्यामंदिर शाळेचा हुकूमशाही प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या शाळेतील मुख्याध्यापिका या विद्यार्थ्यांना बाजारामध्ये, प्रीती ड्रेसेस नावाच्या दुकानावरूनच गणवेश खरेदी करण्यास सांगत आहेत. तर शाळेत गणवेश परिधान करून न आल्यास विद्यार्थ्यांना बाहेर उभे करू आणि वर्गाबाहेर कोंबडा बनवू, अशा धमक्या देत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराला कंटाळून पालकांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात शाळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
हा प्रकार दर वर्षीच या शाळेत अनुभवला जात होता. या वेळेस जरा शाळेचा जास्तच अतिरेक वाढल्याने काही पालकांनी शाळेविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून शाळेविरुद्ध तत्काळ कारवाईदेखील केली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांवर हुकूमशाही गाजवून स्वतःच्या फायद्यासाठी पालकांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या शाळेची खाते मान्यता रद्द करण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलण्याची मागणी पालकांनी केली आहे. शहरातील इतरही शाळेत असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. गणवेशासह पुस्तके घेण्याचीदेखील सक्ती केली जात आहे. आता गणवेशाची विद्यार्थ्यांना सक्ती करणाऱ्या अनुसया शाळेवर शिक्षण विभाग काय कारवाई करणार? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.