हिंगोली - गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत परिश्रम घेऊन, निवडून आलेल्या नूतन ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्त्यांचा पालकमंत्री वर्षा गायकवाड, खा. राजीव सातव यांच्या उपस्थितीत फेटा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नवनिर्वाचित सदस्य सहभागी झाले होते. मात्र, कोरोना परिस्थितीतही मोजक्याच जणांनी मास्कचा वापर केल्याचे दिसुन आले. त्यामुळे कोरोना संपल्याचा भास या उत्सवात होत होता.
फेटा उत्सवात खा. राजीव सातव यांनी राजकारणाचा पाढा वाचला, आज जो काही आहे तो केवळ तुमच्या मुळेच आहे. सर्वात सोपी निवडणूक ही लोकसभेची होती, तुमच्या मुळे आमदार झालो, खासदार झालो, या सर्व निवडणुका सोप्या होत्या, मात्र, सर्वाधिक जास्त अवघड निवडणूक असेल तर ती आहे ग्रामपंचायत अन पंचायत समितीची. या निवडणुकीत कोण कोणाकडे असतो, याचा अजिबात अंदाज लागत नाही. आशा परिस्थितीत कोणाला बोलावे अन कुणाला टाळावे हे कळत नाही. एवढी अवघड निवडणूक तुम्ही लढून आलात त्या बदल सातव यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला.
सदस्यांना बांधले फेटे -
एवढ्या अटी - तटीच्या लढतीत निवडून आलेल्या सदस्यांचा मेळावा घेत, त्यांना काँगेसच्या वतीने मनाचा फेटा घातला. तसेच सत्कार देखील केला. हा सत्कार सोहळा देखील अगदी दिमाखात पार पडला. निवडून आल्याचे चीज करीत गावात विकासाची कामे करा, तसेच सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी ताबडतोब सोडवण्याच्या सूचना देखील सातव यांनी यावेळी दिल्या.
पालकमंत्र्यांनी ही दिल्या शुभेच्छा -
हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी देखील फेटा उत्सवात नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा देत, आप आपल्या गावातील कामे चांगले करण्याच्या सूचना दिल्या. खर तर तुमच्या मुळेच काँग्रेसची खरी ताकद असल्याचे पालकमंत्री गायकवाड यांनी सांगितले.