हिंगोली - गोरेगाव येथील एक शेतकरी गेल्या 38 वर्षांपासून सेंद्रिय ऊसाचे गुऱ्हाळ चालवत आहे. माधव कावरखे, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अतिशय चांगल्या प्रतिच्या आणि आरोग्यदायी गुळामुळे कावरखे यांच्या गुळाला चांगलीच मागणी आहे. त्यांनी आपल्या उत्पन्नाचा दर्जा टिकवून ठेवल्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
कावरखे यांच्याकडे वडिलोपार्जित 12 एकर शेती आहे. यापैकी, एका एकरात त्यांनी सेंद्रिय ऊसाची लावगड केली आहे. जवळपास 38 वर्षांपासून ते सेंद्रिय खतापासून ऊसाचे उत्पन्न घेतात. लागवडीनंतर पहिल्या वर्षापासूनच त्यांनी गुऱ्हाळ सुरू केले. यातून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. पहिल्या वर्षी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद होता. मात्र हळूहळू ग्राहकांची संख्या प्रचंड वाढत गेली.
हेही वाचा - सत्तर वर्षीय शेतकऱ्याची यशोगाथा; आंतरपिकातून शोधला समृद्धीचा मार्ग
ग्राहकांच्या तुलनेत इथे उत्पादन कमी पडते. ग्राहक स्वत:सह नातेवाईकांसाठीही गुळाची पूर्व नोंदणी करून ठेवतात. सेंद्रीय ऊस आणि पूर्णपणे नैसर्गीक पद्धतीने चुलीवर बनवलेला हा गुळ चविष्ट लागतो. त्यामुळे कधीच ग्राहकांची प्रतिक्षा करत बसण्याची वेळ आपल्यावर आली नसल्याचे कावरखे सांगतात. गूळ विक्रीतून त्यांना वर्षाकाठी चार ते पाच लाखांचे उत्पन्न होते.