हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भगवती येथे तूर काढताना मळणी यंत्रामध्ये अडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. राजू दिगंबर जाधव, असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले आहेत.
सध्या तुरीचा हंगाम जोरात सुरू असून शेतकरी तूर काढण्यासाठी धडपड करीत आहेत. राजू देखील शुक्रवारी आपल्या शेतामध्ये मळणी यंत्रातून तूर काढत होता. यावेळी राजू यांचा तोल जाऊन ते मळणी यंत्रात गेले. त्यानंतर आजूबाजूच्या कामगारांनी एकच आरडाओरड केली. सर्व मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत राजूच्या शरीराचे तुकडे झाले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.