हिंगोली - येलदरी धरणातून नदी पात्रात वाहणाऱ्या पाण्यात मासे पकडण्यास गेलेल्या सोपानच्या मृत्यूला विद्युत वितरण विभागच कारणीभूत असल्याचे अनधिकृत जोडणीमुळे उघड झाले आहे. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीचा अलबेल कारभार समोर आला आहे. ही घटना सेनगाव तालुक्यातील डोंगरगाव शिवारात घडली होती. याप्रकरणी अभियंत्यांसह ज्यांच्या शेतात अनधिकृत वीज जोडणी दिली होती त्यांच्या विरुद्ध आत्माराम दूभळकर यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधीक्षक अभियंत्यांसह कार्यकारी अभियंता विद्युत मंडळ हिंगोली, उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता विद्युत मंडळ सेनगाव व गजानन गंगाराम थोरले, राजू गंगाराम थोरवे या सर्वांचा आरोपींमध्ये समावेश आहे. नदी परिसरात असलेल्या शेत शिवारात ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची इलेक्ट्रिक लाईन अनधिकृतपणे जोडली होती. खांब नदी पात्रात असल्याने तसेच सतत विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यात आल्याने सोपान दुभळकर यांचा थर्माकॉलच्या होडीवरून जाळे सोडताना लोंबत्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस वितरण विभाग आणि शेतकरीच जबाबदार असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर हे करीत आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. याआधी तीन ते चार घटना अशाच प्रकारच्या घडल्या आहेत. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.