हिंगोली - हैदराबाद येथील मिरची व्यापाऱ्यांनी अकोला येथे वसूल करून आणलेली 18 लाख रुपयांची रक्कम चोरील गेल्याची घटना घ़डली आहे. हिंगोली ते कनेरगाव नाक्यादरम्यान असलेल्या ढाब्यावर बस थांबली असता, चोरट्याने बॅग पळविली. या प्रकरणी व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांची पथके अकोला मार्गे रवाना केले आहेत.
हेही वाचा - राजधानी एक्स्प्रेसला भुसावळला थांबा द्या; एकनाथ खडसेंचे रेल्वेमंत्र्यांना साकडे
जी श्रीनिवासराव (रा. हैदराबाद) असे मिरची व्यापाऱ्याचे नाव आहे. ते अकोला येथील मिरची व्यापाऱ्यांना मिरची विक्री करतात. त्यानंतर मिरचीचे पैसे वसूल करतात. नेहमीप्रमाणे व्यापारी श्रीनिवासराव हे शनिवारी अकोला येथे पैसे वसूल करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी दोन व्यापाऱ्यांकडून एकूण 18 लाख रुपयांची वसुली केली. ही रक्कम बॅगेत ठेऊन ते खासगी बसने अकोला येथून नांदेड मार्गे निघाले होते. ते बसमधील 23 क्रमांकाच्या सीटवर बॅग उशाखाली ठेऊन झोपले होते. कनेरगाव नाका ते हिंगोली दरम्यान, बस जेवण्यासाठी थांबली. काही प्रवाशांनी उतरून जेवण केले तर श्रीनिवासराव हे झोपूनच होते. त्यांना काही वेळाने जाग आली तर त्यांच्या उशाखाली असलेली पैशाची बॅग ही गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी हा प्रकार चालक आणि वाहकाला सांगून बस थेट हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आणली. त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी घडलेला प्रकार सांगितल्यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
चोरीचा प्रकार अकोला येथेच घडला असण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांचे पथक अकोला येथे रवाना झाले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अगंद सुडके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जगदीश भंडरवार यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - VIDEO : .. त्यामुळे मी कोणाशीही हस्तांदोलन करत नाही, अजित पवारांनी केला खुलासा