हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये एका कोरोनाबाधिताला दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर आठ जणांनांही आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील चार जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून इतर चार जणांचा अहवाल प्रलंबित आहे.
जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेला एक रुग्ण आढळल्याने संपूर्ण जिल्हात भीतीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यासह संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन, त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल केले. आयसोलेशन वार्डमध्ये दाखल असलेल्या आठ जणांचे वैद्यकीय नमुने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवले आहेत. यातील चार अहवाल मिळाले असून ते निगेटिव्ह आहेत.
या मध्ये एका 11 वर्षीय मुलीचा आणि कझाकिस्तान येथून आलेल्या एकाचा त्याच्या भावासह समावेश आहे. तर अन्य एक अहवाल कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा होता. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पथकं करणार तपासणी -
दरम्यान कोरोना रुग्ण आढळल्याने हिंगोलीचे प्रशासन गतीने कामाला लागले आहे. दोन व्यक्तींची एक टीम तयार केली असून, जिल्ह्यात अशा 21 टीम आहेत. प्रत्येक टीम 50 घरात नियमित सकाळी 10 ते 2 सर्वेक्षण करणार आहे. ही टीम कोरोनाची लागण झालेला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करणार आहे. प्रत्येक पाच टीमला एक सुपर वायझर आणि एका वैद्यकीय अधिकऱ्याची नेमणूक केली आहे.