हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील वाकोडी आणि खापरखेडा शिवारात शेतकरी नंदकिशोर रतनलाल शर्मा यांची ३९.३७ हेक्टर जमीन ईडीने जप्त केली (ED Sealed Land) आहे. शर्मा हे गंगाखेड शुगर अँड एजन्सी लिमिटेड (Gangakhed Sugar Limited) विजयनगर माखणीमध्ये अधिकारी म्हणून आहेत. त्यांच्या नावे ही जमीन होती. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्या जमिनीवर ईडीचा फलक लावण्यात आला आहे.
गंगाखेड शुगर ऍण्ड एजन्सी विजयनगर माकणी यांनी कळमनुरी तालुक्यातील वाकोडी, खापरखेडा या दोन्ही शिवारात आठ वर्षांपूर्वी पाच गटात एकूण ३९ हेक्टर जमीन खरेदी केली होती. याच जमिनीमध्ये कारखाना सुरू करण्यात येणार असल्याचा प्रस्ताव होता, मात्र कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यानुसार ईडीने कारखान्याची मालकी असलेल्या सर्वच ठिकाणांची माहिती घेत त्याठिकाणी जमीन ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील खापरखेडा व वाकोडी शिवारामध्ये शेतकरी अधिकारी नंदकिशोर रतनलाल शर्मा यांच्या नावे सातबारा असल्याचे दिसून आले.
पथकाने घेतली कळमनुरी तहसीलमध्ये धाव -
ईडीने ४ जानेवारी रोजी कळमनुरी तहसील कार्यालय गाठून तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याशी चर्चा करून स्थळ निश्चितीसाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांना सोबत देण्याचे सांगितले, त्यानुसार मंडळ अधिकारी किरण पावडे व खापरखेडा येथील तलाठी रेवता लूटे, वाकोडी गंगाधर पाखरे यांना सोबत नेले व शर्मा यांच्या नावे असलेली ३९. ३७ हेक्टर जमीन ताब्यात घेत सील केली आहे. तर त्या जमिनीवर ईडीचा फलकही लावण्यात आला असून, फलक ताबडतोब लक्षात यावा म्हणून त्यावर लाल रंगाचे रेडियम देखील लावण्यात आले आहे.
जमिनीचा सातबारा होता शर्मा यांच्या नावाचा -
कळमनुरी तालुक्यातील वाकोडी शिवारातील गट क्रमांक ९८ मध्ये १०. १९ हेक्टर तर गट क्रमांक ८६ मध्ये २.८४ हेक्टर, ८७ मध्ये ७.९९ हेक्टर जमीन सील केली आहे. खापरखेडा शिवारातील गट क्रमांक १४२ मध्ये १४ हेक्टर जमीन सील केली आहे. जप्त केलेली जमीन गंगाखेड शुगर ऍण्ड एजन्सी लि. विजयनगर माकणी तर्फे अधिकारी नंदकिशोर शर्मा (रा. उमरखेड ) यांच्या नावे होती. मात्र हिंगोली जिल्ह्यात झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. अजूनही कुठे जमीन खरेदी केली आहे का? याचा देखील शोध पथक घेत आहे.