हिंगोली - जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एका हंड्यासाठी ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागत आहे. अशाच परिस्थितीत काशीतांडा येथे ग्रामपंचायतीने नळाचे पाणी १० ते १५ दिवसापासून अचानक बंद केले. याचा राग मनात धरुन एक व्यक्ती दारूच्या नशेत पाण्याच्या टाकीवर चढला.
काशीतांडा येथे दरवर्षी पाणी टंचाईची जाणवत आहे. यातच ग्रामपंचायतच्या नळाला येणारे पाणी अचानक बंद करण्यात आले. त्यामुळे पाण्याच्या शोधात रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. भटकंती करुनही पाणी मिळेलच याची काही शाश्वती नाही. यालाच कंटाळून अनेकांनी शहरात स्थलांतरीत होणे पसंत केले आहे. गावात असलेल्या नागरिकांपैकी महिलांसोबत पुरुषांनाही डोक्यावर हंडा घ्यावा लागत आहे. यामुळेच बबन धेनु आडे दारुच्या नशेत वर चढले आणि जोर-जोरात ओरडू लागले. दरम्यान, आडे यांना उतरवण्याऐवजी त्यांचा व्हिडिओ काढण्यात अनेकजण मग्न होते. यादरम्यान, त्यांचा पाय घसरला अन ते जमिनीवर कोसळले. यात त्यांच्या एका पायाचे हाड तुटले. नागरिकांनी त्यांना ओंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करुन पुढील उपचारासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात दाखल केले.
गावातील पाणी बंद केल्यानेच मला राग आला अन् मी पाण्याच्या टाकीवर आत्महत्या करण्यासाठी चढलो, असे आडे यांनी सांगितले.