हिंगोली : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आज (सोमवार) जिल्हा दौर्यावर येणार असल्याने शासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली आहे. आयुक्त कोणत्या गावात जातील, काय आढावा घेतील, याची प्रशासकीय यंत्रणेला जराही माहिती नसल्याने, जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्वच गावांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सरपंचासह वरीष्ठ शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत धावपळ उडाली आहे. तर, प्रत्येकवेळी आयुक्तांचा अचानक दौरा असल्याने, अशीच तारांबळ उडते.
आयुक्त सुनील केंद्रेकर हे दौर्यावर येणार होते, केवळ एवढीच माहिती हिंगोली प्रशासनाला होती. मात्र, ते केव्हा येणार याची अजिबात कल्पना नव्हती. तेव्हा पासूनच तयारी सुरू होती. अन् आज अचानक आयुक्त हे दौर्यावर आल्याने ते कोणत्या तालुक्यातील गावाला भेट देतील याची जराही कल्पना नव्हती. आयुक्त हे जिल्हा स्तरावर, तालुका अन् ग्रामस्तरावर करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाला भेट देणार आहेत. त्या अनुषंगाने संबधित यंत्रणेने सर्वच गावातील ग्राम स्तरावर तयार केलेल्या यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या-ज्या आरोग्य केंद्रांतर्गत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली त्यांनीही गावात धाव घेण्यास सुरुवात झाली आहे.
गाव पातळीवर पर जिल्ह्यातून आलेल्यांच्या नोंदी, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर वापर केल्यासह रजिस्टर मेंटेन करण्याच्या सूचनादेखील संबधित शासकीय यंत्रणेने त्या त्या गावातील आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवकाना दिल्या आहेत. एकंदरीतच अचानक जिल्हा दौर्यावर आलेले आयुक्त आता कोणत्या गावात जातील, याची धास्ती प्रशासकीय यंत्रणेला लागली आहे. आता त्यांच्या भेटीत काय काय उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.