हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वाहन वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश काढले आहेत. स्वतः रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.याच वेळी एका रुग्णवाहिकेला अन ट्रॅक्टरला त्यांनी रस्ता मोकळा करून दिला.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन गतीने कामाला लागले आहे. वसमतमध्ये एक पॉझिटिव्ह आढळल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. कारण नसताना वाहने घेऊन शहरात फेरफटका मारत मारणाऱ्यांवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उचललाय.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुचाकी, चारचाकी आणि तीनचाकी वाहनांना रस्त्यावर फिरण्यास बंदीचे आदेश काढले. याची पाहाणी करण्यासाठी ते शहरात फेरफटका मारत होते. यावेळी त्यांना अनेक वाहने रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी गाडी रस्त्यावर आडवी लावली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः वाहनांची तपासणी केली. यावेळी 100 च्या वर वाहने ताब्यात घेण्यात आली. यावेळी एका रुग्णवाहिकेला देखील त्यांनी रस्ता मोकळा करून दिला. जप्त करण्यात आलेली सर्व वाहने शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी वाहने सोडून नेण्यासाठी कागदपत्रे घेऊन येत आहेत. मात्र, लॉकडाऊन संपेपर्यंत वाहने पोलिसांच्या ताब्यात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.