हिंगोली - वडील रात्रंदिवस मोल मजुरीचे काम करतात. आई मिळेल ते काम करून संसार करते. घरात कोणीही शिकलेले नाही, अशी बिकट परिस्थिती असताना कोणतीही शिकवणी न लावता आणि ज्या शाळांना गुणवत्तेच्या बाबतीत कमी लेखले जाते, अशा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन गतिमंद वडीलांच्या मुलीने ७७.६० टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे.
शितल बंडू दिवाने (राहणार, सवना तालुका सेनगाव) असे या मुलीचे नाव आहे. शितल ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे आई, वडील आणि स्वतः शितलचे वडील हे सर्वजण जेव्हा काम करतील, तेव्हाच घरची चूल पेटेल अशी परिस्थिती आहे. अशातही शितलने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. आईसोबत शाळेला दांडी मारून मजुरीच्या कामाला जात तिने दहावीचे शिक्षण घेतले. वडीलांना त्यांची मुलगी कोणत्या वर्गात आहे. याचीही माहिती नाही. आज दहावीचा निकाल लागला तेव्हा शितलचे गावात कौतुक होत असताना वडील हिंगोली येथे गवंड्याच्या हाताखाली कामानिमित्त गेलेले होते. तर, आई देखील मजुरीच्या कामाला गेलेली. फक्त आजच निकाल असल्याने पहिल्यांदाच शितल घरी राहिली होती.
बंडू दिवाने यांना वडिलोपार्जित १ एकर शेती आहे. त्यातही वाटणी झाल्याने अर्धा एकर शेत वाट्याला आले आहे. त्यातून काहीच उत्पन्न होत नसल्याने कुटुंबाला मजुरीने काम केल्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकणाऱ्या शितलला भविष्यात शिक्षक बनायचे आहे.