हिंगोली - जिल्ह्यातील विविध भागात आज सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून वाऱ्याने डोलणारी पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यावर दुबार नव्हे, तर तीन वेळा पेरणी करण्याचे विदारक संकट येऊन ठेवले आहे. अगोदरच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला जास्तीच्या पावसाने हैराण करून सोडले आहे.
जिल्ह्यात सलग तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. नियमित सुरू असलेल्या पावसामुळे शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदी नाले ही दुथडी भरून वाहत असल्याने शेतातील उभे पीक पूर्णपणे खरडून जात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पेरणी देखील करता आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली अशांची उगवणच झाली नाही.
ज्या शेतकऱ्यांची उगवण झालेली आहे, अशांच्या पिकांची वाढ खुंटली असून नेहमीच सुरू असलेल्या पावसाने ही पिके आता पिवळी पडत आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. तसेच शेतकरी पीक कर्ज घेण्यासाठी कधी बँकेत, तर कधी ऑनलाईन सेंटरवर धाव घेत आहेत. मात्र, तिथेही शेतकऱ्यांना यश येत नाही. दुसरीकडे मात्र जिल्ह्यात अद्यापपर्यंत १६ टक्के पीककर्ज वाटप झाल्याचे बँक अधिकारी शशिकांत सावंत यांनी सांगितले.
सोयाबीनच्या बियाणांची उगवण न झाल्याने आणि नियमित पाऊस सुरू असल्याने शेतकरी कोंडीत सापडलेले आहेत. त्यामुळे प्रशासन स्तरावर निदान नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, पंचनामे करत लवकर मदत मिळावी एवढी अपेक्षा शेतकरी करत आहेत.