हिंगोली - जिल्ह्यात रविवारी रात्री परतीच्या पावसाने हाहाकार माजविला. या मुसळधार पावसामुळे कयाधु नदीचा बंधारा फुटला आणि पाण्याचा प्रवाह थेट ईडोळी ते सवडपर्यंत पोहोचला. यात शेतीचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे हिंगोली तालुक्यातील सवड, इडोळी, परिसरातील कयाधु नदीवर असलेला बंधारा फुटला आणि पुराचे संपूर्ण पाणी शेतामध्ये शिरले. पाण्याच्या प्रवाहात शेतातील सुपीक गाळ वाहून गेला. यामुळे पिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाची प्रशासनाकडे २४.४४ मिलीमिटर एवढी नोंद झाली आहे.
दरम्यान, या परतीच्या पावसामुळे उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. मात्र, या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली प्रमाणेच कळमनुरी, औंढा, सेनगाव तालूक्यालाही परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. नवनिर्वाचित कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.