हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण राज्यात सर्वच सण उत्सव रद्द केले आहेत. तरी देखील हिंगोली जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या ओंढा नागनाथ येथे आपत्ती व्यवस्थापनाचे सर्वच नियम पायदळी तुडवत मोठ्या उत्साहात पालखी सोहळा पार पडला. त्यामुळे तलाठ्यांच्या फिर्यादीवरून शिवसेना आमदार संतोष बांगरसह इतर ४० ते ५० जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-'उद्धव ठाकरेंचे भाषण गडबडलेल्या पक्षप्रमुखांच्या भाषणाचा उत्तम नमुना'
अनिल किशन देव, अनिल बापूराव देशमुख, सतीश चौडेकर, मनोज देशमुख, माधव मारोती गोरे, दीपक राजू सोनवणे सर्व राहणार ओंढा ना., राहुल दंतुलवार, संतोष लक्ष्मण बांगर, गुड्डू बांगर रा. हिंगोली, शंकर यादव रा. बोरजा, सुरेश हंसगीर गिरी, व इतर लोकांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही गत वर्षी प्रमाणे याही वर्षी दसरा महोत्सवानिमित्त मोठ्या थाटामाटात पालखी मिरवणूक काढली. प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव रद्द केलेले आहेत.
हेही वाचा- 'सरकार पाडून दाखवा; आम्ही सत्तेच्या ढेपेला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखे नाही'
शिवसेनेचाच आमदार धार्मिक कार्यक्रमात सहभागी..
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण जनतेला धार्मीक सण साजरे न करण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र दुसरीकडे शिवसेनेचेच आमदार धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती असल्याने, प्रशासनाच्या वतीने हा गुन्हा दाखल केला आहे.