हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यासह देशभरातील यात्रा-जत्रा, धार्मिक विधी, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना स्थगिती द्यावी लागली आहे. एवढेच नाही तर अनेक विवाह उत्सुक जोडप्यांचे स्वप्न थोडे लांबणीवर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही एका नवरदेवाने बोटावर मोजण्या एवढ्या लोकांच्या उपस्थितीतच आपला विवाह सोहळा उरकून घेतल्याचा प्रकार हिंगोलीत समोर आला आहे.
कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी पाच पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी येण्यावर बंधन घालण्यात आली आहेत. अशा परिस्थितीतही म्हाळशी येथे वधू अन् वराने लग्न लावण्यासाठी एका व्यक्तीस मदतीला घेऊन घरातच आपला विवाह सोहळा उरकला आहे. विशेष म्हणजे खबरदारी म्हणून नवरी नवरदेवानी मास्क देखील वापरल्याचे पाहावयास मिळाले. तर हे नवविवाहित जोडपं दुचाकीवरूनच नवरदेवाच्या घरी देखील परतले आहे. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात एकच चर्चा होत आहे.
बाळू कैलास चाटसे अन अश्विनी लक्ष्मण भुक्तर अशी विवाह बांधनात अडकलेल्या जोडप्याची नावे आहेत. एरवी लग्न म्हटलं की दोन महिन्यापासून तयारी असते. मात्र कोरोना सारख्या महा मारीमुळे या वर्षी सर्व नियोजन बिघडलं आहे. या विदारक परिस्थितीमध्ये लग्नाळूची मोठी पंचायत निर्माण झाली आहे. या मध्ये मात्र या जोडप्याने चांगलाच पर्याय निवडला आहे.
काही दिवासापूर्वी या दोघांच्या विवाहासाठी आजच्या दिवशीचा मुहूर्त निश्चित केला होता. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आणि हा विवाहसोहळा पुढे ढकलण्याची तयारी सुरू केली. त्यातूनही मार्ग काढत हा विवाह आजच्याच दिवशी अतिशय साध्या पद्धतीने उरकून घ्याायचे नियोजन करण्यात आले.
विवाह उरकण्यासाठी ठरल्याप्रमाणे आज नवरदेव नवरीच्या घरी एकटाच दुचाकीवर पोहोचला, त्या ठिकाणी सर्व तयारी झाली होती. तेथे पोहोचल्यानंतर नवरीच्या आई-वडिलांनी स्वागत केले, अन् घरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या फोटोसमोर वंदना घेऊन या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे दोघांनीही मास्क घालून एक मेकांच्या गळ्यात पुष्पहार टाकले. त्यानंतर नवरीला नवरदेवाने दुचाकीनेच घरी आणले. या आगळ्या वेगवेगळ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.