हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा दुसराही अहवाल औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयातून निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाने आता सुटकेचा श्वास सोडला आहे.
हिंगोली जिल्ह्यात एका रुग्णाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला 31 मार्चला शासकीय रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. सदरील रुग्णाचे नमुने औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये रुग्णाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जीप सीईओ राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. शिवाजी पवार, डॉ.शल्यचिकित्सक किशोरीप्रसाद श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोपाल कदम या सर्वानी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कामकाजाचे नियोजन केले.
पॉझिटिव्ह रुग्णाचा 14 दिवसानंतरचा पहिला अहवाल बुधवारी निगेटिव्ह आला. त्यानंतरचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला. हिंगोली जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने सर्वांमध्येच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तर आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले होते. मात्र, यंत्रणेने तेवढयाच जोमाने काम केले. या रुग्णांचे दोन्ही नमुने आता निगेटिव्ह आल्याने, त्याला सुट्टी देण्याबद्दल आज विचार केला जाणार आहे.