हिंगोली - आईवडिल नसलेल्या एका युवतीला गोड बोलून फसवून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल सतीश पुरी (32) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह आणखी इतर तीन आरोपी आहेत.
पीडिता ही हिंगोली तालुक्यातील कानडखेडा बु. येथील रहिवासी आहे. तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. ती आपल्या आजीकडे एका बहिणीसह राहते. तर पीडितेचे काका या बलिकेचे शिक्षण व सर्व खर्च भागवतात. याच संधीचा फायदा घेऊन शेजारील एका तरुणाने पीडितेशी ओळख केली. यानंतर आजीकडे राहत असलेल्या घरात आरोपीचे येणे जाणे वाढले. हीच वेळ साधून या आरोपीने युवतीला प्रेमात पाडले. तो नेहमी तिला गोड पुडीत गुंगीचे औषध टाकून, तिच्यावर वारंवार बलात्कार करित राहिला.
युवतीला हा संपुर्ण प्रकार शुद्धीवर आल्यानंतर लक्षात येत होता. तिने अनेकदा या प्रकाराला विरोधही केला होता. मात्र, ते गुंगीचे औषध खाल्ल्यानंतर ती बेशुद्ध होत होती. दरम्यान, आरोपीने तिला हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तसेच युवतीला वाहनाने घेऊन वेश्याव्यवसाय करण्यासाठी चंद्रपूर येथे घेऊन गेला होता. तिथे कारखाना भागात एका घरात डांबून ठेवले होते. तसेच तिची विक्री करणार असल्याची धक्कादायक बाबही पीडितेने सांगितली.
युवतीच्या नातेवाईकांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात युवती हरवल्याची तक्रार दिल्यावर या पीडितेचा शोध घेण्यात आला. गोरेगाव पोलिसांनी चंद्रपूर येथून तिची सुटका केली.
विशेष बाब म्हणजे, युवतीला चंद्रपूर येथे सोडुन देऊन घरी परतलेला आरोपीही युवतीला शोधून आणण्यासाठी युवतीच्या नातेवाईकासोबत फिरण्याचा बनाव करीत होता. त्यामुळे त्याच्यावर कुणाला शंका आली नाही. मात्र, युवतीने सर्व भांडाफोड केल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी घ्यावे लागले खेटे -
बुधवारी दिवसभर गुन्हा दाखल करावा म्हणून, पीडिता तिच्या नातेवाईकांसोबत हिंगोली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेण्यासाठी ताटकळत थांबली होती. यानंतर सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख यांची भेट झाली. त्यांनी गोरेगाव पोलिसांना संपर्क करून, गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आदिवासी पँथरचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रशांत बोडके यांनी पीडिता आणि नातेवाइकांसह गोरेगाव येथे धाव घेतली.
मात्र, तिथे महिला कर्मचारी उपस्थित नसल्याने, केवळ डायरीत नोंद करून घेत दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यासाठी बोलावल्याचे बोडखे यांनी सांगितले. यानंतर दुसऱ्या दिवशी आल्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकी भयंकर घटना असतानाही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रचंड टाळाटाळ करण्यात आली होती. महिला आणि युवतीवरील अत्याचार अजिबात कमी झालेला नसल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.