हिंगोली - भाजपा सरकारने पाच वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांसाठी घेतलेले सर्व निर्णय धोकादायक आहेत. त्यांचा सर्वाधिक फायदा व्यावसायिकांना आणि उद्योगपतींना होत आहे. हे हिटलरशाहीचे सरकार शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आम्हाला 'अच्छे दिन नको, निदान जूने तरी दिवस दाखवा', अशी मागणी खासदार राजीव सातव यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातव यांच्या नेतृत्वाखाली 'शेतकरी बचाव, भाजपा सरकार हटाव' आंदोलन करण्यात आले.
भाजपा सरकार सर्वसामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. अंबानी, अदानी आणि इतर उद्योगपतींना मोठे करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. शेतकरी विधेयक हे शेतकऱ्यांसाठी फार मोठी डोकेदुखी बनणार आहे. या विधेयकामुळे शेतकरी माल विक्रीसाठी घेऊन जाऊ शकणार नाही. मोदी सरकारने शेतकऱयांची थट्टा मांडली आहे, असा आरोप सातव यांनी केला.
येणाऱ्या काळामध्ये सर्व जबाबदारी कंपन्यांकडे देऊन शेतकऱ्यांना मजूर बनवण्याचा मानस या सरकारचा आहे. नवीन कायद्यानुसार स्थानिक स्तरावर समस्या मांडण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे जावे लागणार आहे. ते जो निर्णय घेतील तो शेतकऱ्यांना मान्य करावा लागेल. शेतकऱ्यांना न्यायालयात देखील जाता येणार नाही. या नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसानच होणार आहे, असे सातव म्हणाले.
भाजपा सरकारने अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडितेच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की होणे ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आता काँग्रेस अजिबात गप्प राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये भाजपा सरकारविरोधात जोरदार आंदोलने करणार असल्याचा इशारा सातव यांनी दिला.