हिंगोली - लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर नवनिर्वाचित खासदार हेमंत पाटील यांनी शहरातून विजयी रॅली काढली. मात्र, यासाठी पोलिसांची परवानगी न काढल्यामुळे निवडून आल्याच्या पहिल्याच दिवशी गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शंकर पांढरे यांच्या तक्रारीवरून त्यांच्यासह सुमारे १०० ते२०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभेचा निकाल २३ मे रोजी जाहीर झाल्यानंतर हेमंत पाटील यांनी शिवसेनेच्या वतीने हिंगोली शहरातून विजयी रॅली काढली. रॅलीमध्ये हत्ती, घोडे, आदिवासी नृत्य, वाजंत्री असा मोठा लवाजमा होता. मात्र, या विजयी मिरवणुकीला पोलिसांकडून परवानगी घेतलेली नव्हती. तसेच वाद्य वाजवण्यासंदर्भातही परवानगी घेतलेली नव्हती. यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत ही मिरवणूक रात्री साडेबारा वाजेल्यानंतरही ही चालली. या मिरवणुकीमुळे हिंगोलीकराना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी गंभीर दखल घेत पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरुध्द शुक्रवारी ५ वाजता गुन्हे दाखल केले.
संसदेमध्ये जाऊन कायदे बनवणाऱ्या लोकप्रतिनिधीनेच विजयाच्या पहिल्याच दिवशी कायद्याचे पूर्णता धिंडवडे उडवल्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र या गुन्ह्याची माहिती प्रसारमाध्यमांना मिळू नये यासाठी खबरदारी घेतली. गुन्हा दाखल होऊन ४८ तास उलटले आले तरी हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक घोरबांड या गुन्ह्याची माहिती देण्यास टाळाटाळ करत होते.
पोलीस प्रशासन केलेल्या थातूर-मातूर कारवायीचे डी आर, फोटो, सर्व काही माहिती विविध पत्रकारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करतात. मात्र, खासदारासह इतर १०० ते २०० जणांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती देणे शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना का योग्य वाटले नाही? अशी चर्चा सुरू आहे. मात्र, विजयाची माळ गळ्यात पडल्यानंतर पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित खासदारावर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.