हिंगोली - जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तिनही मतदारसंघांचे आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करीत आहेत. मात्र, भरभरून मताधिक्याने निवडून दिलेले हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील कुठेही दिसतच नाहीत. त्यांच्याकडे जराही वेळ नाही. त्यामुळे आमचे खासदार हरवले की काय? अशी भीती वाटत असून त्यांना शोधून आम्हाला द्या, अशी विनंती नागरिक करीत आहेत. एवढेच नाहीतर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांनी खासदार हरवल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील विधानसभा निवडणुकीत देखील जिल्ह्यात आले नाहीत. तसेच मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. जिल्ह्यातील आमदार शेतकऱ्यांना धीर देत आहेत. मात्र, पत्नीच्या पराभवातून अजूनही न सावरलेले खासदार महोदय जिल्ह्यात दाखल झालेच नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतापले आहेत. एवढेच नाहीतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल होत आहेत.
हे वाचलं का? - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंत्रालयासमोर आंदोलन
उपऱ्या म्हणून झालेली टीका पुसण्यासाठी तरी भेट द्या -
लोकसभा निवडणुकीवेळी खासदार हेमंत पाटील यांच्यावर उपऱ्या म्हणून टीका झाली होती. तरीही हिंगोलीकरांनी लाखोंच्या मताधिक्याने पाटील यांना निवडून दिले. रसाळीच्या स्नेह भोजनात दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फक्त ते संपर्कात आहेत. त्यातही फोन नव्हे तर तुमची तक्रार टाका, असे सांगितले आहे. एवढेच नाहीतर त्याला वेळेची मर्यादा देखील घालून दिली आहे. त्यामुळे तुमच्यावर झालेली उपऱ्या नावाची टीका पुसण्यासाठी तरी भेट द्या, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
हे वाचलं का? - अचूक खड्डे मोजा अन् ५ हजार बक्षीस मिळवा; नांदेडमध्ये अनोखी स्पर्धा..!
खासदार महोदय शुभेच्छा फलकावरूनही गायब -
खासदार हेमंत पाटील जिल्ह्यातून गायब झाले आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवारांच्या विजयानिमित्त शहरात जागो-जागी शुभेच्छा फलक लावण्यात आले आहे. त्यावरूनही खासदार महोदय गायब झाले आहेत. खासदाराने प्रशासन स्थरावर पाठपुरावा करून धीर देणे गरजेच आहे. मात्र, तसे अजिबात होत नाही. नांदेड जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची हाक फक्त लेटरपॅडवरून दिसत आहे. एकंदरीतच हिंगोलीतून अन् फलकावरून गायब झालेले खासदार हिंगोलीत कधी परत येतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.