हिंगोली - शहरातील विविध भागात कोरोनाचा सामूहिक संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी शहरात संचारबंदीची गरज असल्याचे सांगत, यासंबधी एक पत्र जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली शहरात कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी पुढील पाच दिवस संचारबंदीचे आदेश काढले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. सोबतच हिंगोली शहरातील विविध भागात ही कोरोनाचे सामूहिक संक्रमण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगाने काही खाजगी रुग्णालय आणि शासकीय कार्यालय देखील सील करण्यात आले आहेत. हिंगोली शहर नगर पालिका हद्दीत कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी शहरात संचारबंदी लागू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना पत्र लिहले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी जयवंशी यांनी शहरात 5 ते 10 जुलैपर्यंत संचारबंदीचे आदेश काढले आहेत.
जिल्हाधिकारी जयवंशी यांनी शहराच्या सर्व सीमा संचारबंदी काळात बंद केल्या आहेत. या सीमेमधून वाहन किंवा व्यक्तीला बंदी असून, या कालावधीत शहरातील राष्ट्रीयकृत बँका तसेच शासकीय कामकाजासाठी, बँकेची रोकड ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी परवानगी आहे. संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणती व्यक्ती रस्त्यावर अथवा बाजारात आढळून आल्यास संबंधित व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहिता 860 चे कलम 188 अन्वये शिक्षक पात्र असलेला अपराध केला आहे. असे मानून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 महाराष्ट्र कोव्हिड - 19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे या पाच दिवसात कोणीही रस्त्यावर विनाकारण फिरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल
हेही वाचा - गुरुपौर्णिमा विशेष : 'वडील हेच माझे गुरू' - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी