हिंगोली - जिल्हा कोषागार कार्यालयातून वैद्यकीय बील काढून देण्याच्या मागणीसाठी 11 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले आहे. बऱ्याच दिवसांपासून हा लिपिक लाचलुचपत विभागाच्या रडारवर होता. अखेर आज या लिपिकाला अटक करण्यात आली आहे. विनायक देशपांडे असे या लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
आरोपीने तक्रारदाराच्या मुलीचे वैद्यकीय बील जिल्हा कोषागार कार्यालयातून मिळवून देण्यासाठी 11 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत कार्यालयात संबंधित लिपिकाविरोधात तक्रार दिली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने तक्रारीची शहानिशा केली, यामध्ये लिपिक हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत विभागाने जिल्हा सामान्य रुग्णालयात लाच घेतांंना या लिपिकाला अटक केली.