हिंगोली - विस्तव जवळ असल्यावर त्याची कमी जास्त प्रमाणात झळ बसतेच. मात्र, सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव गावात विस्तवाची भीती नाहीशी झाली आहे. लहाडी पौर्णिमेच्या दिवशी याठिकाणी लहाडीचे आयोजन करण्यात येते आणि धगधगत्या निखाऱ्यांतून महिला, पुरूष, युवक, बालक धावतात. गेल्या 100 वर्षांपासून या गावकऱ्यांनी ही परंपरा जोपासली आहे.
बाभूळगाव येथे असलेले श्री येडोबा महाराज संस्थान या धगधगत्या लहाडीमुळे प्रसिद्ध आहे. लहाडी पौर्णिमेला दिवसभर याठिकाणी यात्रा भरते. या ठिकाणी भाविक मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस करतात. या लहाडीतील धगधगत्या निखाऱ्यावरून धावतात. मनोकामना पूर्ण झालेले भाविक याठिकाणी तो नवस फेडतात. यावर्षी जवळपास एक ते दीड लाख भाविकांनी याठिकाणी हजेरी लावली. मोठ्या भक्तिभावाने हा कार्यक्रम केला जातो.
हेही वाचा - कर्जमाफीच्या मुद्यावरुन बच्चू कडूंचा बँकांवर गंभीर आरोप
या परिसरातील ग्रामस्थांसाठी हा कार्यक्रम एक पर्वणीच असते. या कार्यक्रमासाठी अनेक मुली आपल्या माहेरी येतात. रात्री उशिरा पर्यंत या ठिकाणी गर्दी कायम असते. तर या निखाऱ्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे येथील वयोवृद्धांनी सांगितले आहे. पूर्वीच्या काळी ही लहाड खोदल्यानंतर आग लावण्यासाठी आगपेटीची गरज पडत नसे. खड्डा खोदल्यानंतर आपोआपच यात आग लागत होती, असे काही वडीलधारी मंडळी सांगतात.