हिंगोली - एका तरुणाला जाती धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात भीमराव धाबे यांच्या तक्रारीवरून विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्रफुल्ल संजय सावळे असे या तरुणाचे नाव असून तो हिंगोली तालुक्यातील पेडगाववाडी येथील रहिवासी आहे. तसेच तो टायगर ग्रुप या संघटनेचा कार्यकर्ता आहे. या तरुणाने 8 जून 2020 रोजी स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून वट सवित्रीनिमित्त वडाला दोरे बांधून फेरे मारण्याच्या मुद्द्यावरून बौद्ध महिला तसेच बौद्ध समाजाबद्दल वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली होती. त्या पोस्टवरून या तरुणाला काही बौद्ध तरुणांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या गावात तरुण गेल्यानंतर तो युवक गावातून गायब असल्याची माहिती समोर आली.
त्यामुळे सदरील तरुणाविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात भीमराव ज्ञानोजी धाबे यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (ए) 292, 500 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 (1) (व्ही) 3, (1) या कलमान्वये आरोपी प्रफुल्ल संजय सावळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.