हिंगोली - जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे रस्त्यावरून गेला म्हणून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी मृत महिलेच्या मुलांनी मृतदेह स्मशानभूमीत न नेता थेट पोलीस ठाण्यात नेला. त्यानंतर सुमारे साडे तीन तास मृतदेह तसाच ठेवून विटंबना केली. त्यामुळे मृताची दोन मुले आणि तिचा साडू यांच्यासह इतर १० ते १२ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
येळी येथील चंद्रकला मुकिंदा घुगे या बुधवारी (५ जून) गावातील एका रस्त्यावरून गेल्याने वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर हणामारीत झाले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता.
चंद्रकला यांचा मृतदेह औरंगाबाद येथून त्यांच्या गावी अंत्यसंस्कारासाठी न नेता त्यांची दोन मुले दत्ता आणि राणोजी तसेच दत्ताचा सासरा मस्के यांनी त्यांचा मृतदेह थेट औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला. यात त्यांच्यासोबत इतरही १०-१२ जणांचा समावेश होता. महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोपी असणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करत या आरोपींनी हिंगोली-औंढा रस्त्यावर सुमारे ३.३० तास रास्ता रोको केला. औंढा नागनाथ पोलीस ठाण्यासमोर जमिनीवरच चंद्रकला यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दत्ता घुगे, रानोजी घुगे आणि दत्ता याचा सासरा मस्के यांच्यासह इतर १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या घटनेमध्ये औंढा नागनाथ पोलिसांनी घटनेतील महिला गंभीर जखमी असताना तिच्या नातेवाईकांना फोन करून फिर्याद देण्याची विनंती केली होती. परंतु नातेवाईकांनी फिर्याद दिली नाही. त्यामुळे मृताचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना काही अवधी आवश्यक असतानाही विनाकारण या मंडळींनी पोलीस ठाण्यासमोर हैदोस घालून मृतदेहाचीही विटंबना केली, असे वाघमारे यांनी म्हटले आहे.