हिंगोली - बस चालकांना किरकोळ कारणावरून मारहाण होत असल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या लिंबाळा मक्ता भागात घडली आहे. येथे दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून एकाने बस चालकासोबत हुज्जत घातली आणि त्याला गंभीर मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली.
बस चालक विश्वनाथ माधव घुगे हे परभणी येथून (एम.एच. बी.एल.१७५६) क्रमांकाच्या बसने सकाळी पावणे दहाच्या सुमारास प्रवासी घेऊन हिंगोलीकडे येत होते. दरम्यान, लिंबाळा मक्ता भागात दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून एका दुचाकी चालकाने बस चालक घुगे यांना गाडी बाहेर काढले आणि त्यांच्याशी वाद घातला. हा वाद बराच वेळ चालला. वादाचे रुपांतर नंतर भांडणात झाले आणि दुचाकीस्वाराने चालकाला लाथा बुक्क्यानी जबर मारहाण केली.
भांडण सोडविण्यासाठी अनेकांनी मध्यस्थी केली. मात्र दुचाकीस्वार अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. कशी बशी चालकाने सुटका केली आणि बस थेट ग्रामीण पोलीस ठाण्यात आणली. तेथे बस चालकाने संबंधित दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यासाठी आता बसचालक आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. अचानक दिवसेंदिवस वाढत असलेल्या अशा हल्ल्यांमुळे वाहन चालक चांगलेच भांबावून गेले आहेत.