हिंगोली - भाऊबीजेसाठी बहिणीला आणायला जाणाऱ्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सावन सुभाष बोलवार (वय-23 रा. पानकनेरगाव ता. सेनगाव जि. हिंगोली) असे मृताचे नाव आहे.
मृत सावन हे भाऊबीजेच्या निमित्ताने आपल्या बहिणीच्या गावाला दुचाकीने रवाना झाले होते. मात्र, सेनगाव ते रिसोड राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट राहिल्याने अंधारात मातीच्या ढिगाऱ्यावरून त्यांची दुचाकी पलटली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर प्रवाशांनी त्यांना जखमी अवस्थेत वाशीम येथील रूग्णालयात उपचारासाठी हलवले असता त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.
हेही वाचा - पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांनी पोलिसांना धरले जबाबदार
...अनं बहिणीसोबत झालं शेवटचं बोलणं -
सावन बोलवार यांची बहीण भाऊबीज सणासाठी रिसोड येथे बसस्टॉपवर सासरहून आली होती. यावेळी तिने मी बस स्थानकावर आले असल्याचे फोनवरून आपल्या भावाला सांगितले. होते. त्यावर मी काही वेळातच त्याठिकाणी पोहोचतो, असे सांगितले. यानंतर ते रिसोड मार्गे रवाना झाले. मात्र, रस्त्यातच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांचे बहिणीसोबत बोलणे शेवटचे ठरले.
बहिणीला दिली खोटी माहिती -
रिसोड बसस्थानकवर सावन यांची बहीण वाट पाहत असताना त्यांचा रस्त्यातच अपघाती मृत्यू झाला. सावन यांच्याजवळ असलेल्या मोबाईलच्या सहाय्याने प्रवाशांनी त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. तिकडे बस स्थानकावर वाट पाहत असलेल्या त्यांच्या बहिणीशी नातेवाईकांनी संपर्क साधला. आणि काहीतरी कारणामुळे सावनने तुझ्याकडे येण्याचे अचानक रद्द केल्याची खोटी माहिती दिली. मात्र, बहिणीचा यावर अजिबात विश्वास बसला नाही. थोड्या वेळाने तिला सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिला धक्काच बसला.
हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : 'नो बेल ओनली जेल', आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार
रस्ता ठरतोय अपघाती -
अनेक दिवसांपासून सेनगांव ते रिसोड राष्ट्रीय महामार्गाचे काम आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे फलक, बोर्ड न लावल्याने तसेच जागोजागी खड्डे असल्याने मागील एका वर्षात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. सुस्त प्रशासनामुळे हा रस्ता अजून किती जणांचे बळी घेणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.