हिंगोली - दहावीचे वर्ष हे जीवनातील महत्वाचे वर्ष असते. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढे शिक्षणाची सुरुवात होते. अशाच आयुष्याच्या वळणावर गावात सर्वांचा लाडका असलेला धोंडू नावाचा मुलगा दहावीत प्रत्येक विषयात 35 मार्क घेऊन, पास झाला आहे. त्यामुळे धोंडूसह त्याच्या कुटुंबात अन त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या काकाने गावात सर्वांना साखर वाटली. तर दहावी पास झाल्याचा मला विश्वासच बसत नाही, असे धोंडू म्हणत आहे.
सुनील गजानन जाधव (रा. माळहीवरा), असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. पण, सुनील हा गावामध्ये धोंडू नावाने प्रसिद्ध आहे. तो थोडाफार विसरभोळा पण मनाने निर्मळ असल्यामुळे तो सर्वांचा लाडका आहे. प्रत्येकाच्या हाकेला उत्तर देणारा धोंडू सर्वांच्या गळ्याचे ताईत आहे. घरी एक भाऊ आई-वडील, असा धोंडूचा परिवार आहे. त्यांच्याकडे दीड एकर शेती असून दुसऱ्याच्या शेतात रोजंदारी करून हे कुटुंब संसाराचा गाडा हाकत आहे. तर धोंडू ही सुट्टीच्या दिवशी शेतात जाऊन रोजंदारी करून आई-वडिलांना मदत करतो. अशाच परिस्थितीमध्ये दहावीचा निकाल लागला अन धोंडूाला प्रत्येक विषयामध्ये 35 मार्क मिळाले आहे. त्यामुळे धोंडूचा तर आनंद गगनात मावेनासा झाला आहे. धोंडूपेक्षा जास्त आनंद गावकऱ्यांना व त्याच्या मित्रांना आहे. तर कुटुंबांनाही निकाल हाती येताच आई-वडिलांनी धोंडू याचे औक्षण करून पेढे वाटले.
धोंडूलाही त्याच्या पास होण्यावर विश्वास बसत नाही. मात्र, आता त्याची शिक्षणाची इच्छा जागी झाली आहे. आता मी खूप शिकणार अन मोठा साहेब होणार, असे धोडू सांगत फिरत आहे.