हिंगोली - कोरोना विषाणूने चीनमध्ये मृतांच्या संख्येत वाढ होत चालली असून भारतासह इतर देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. चिकनमधून कोरोना रोग पसरत असल्याची अफवा पसरल्यामुळे चिकन-मटण खाण्याकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म उत्पादकांनी 10 रुपये किलो जिवंत कोंबडीचा दर करूनही कोणी खरेदी करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पादनकर्ते चांगलेच धास्तावले आहेत.
कोरोनाची दहशत सर्वत्र निर्माण झाली असताना नांदेड जिल्ह्यात एक संशयित रुग्ण आढळल्याने हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा आजार चिकन खाल्ल्याने होत असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली असल्याने मांस खरेदीकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता चिकन व्यवसायिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. चिकनची अजिबात विक्री होत नसल्याने व्यवसायावर कशी गदा आलीय याची आपबिती रेउलगावच्या प्रकाश फेगडे यांनी सांगितली.
हेही वाचा - हिंगोलीत 50 लाखांचे सागवान जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नेहमी 70 ते 80 रुपये किलो प्रमाणे विक्री होणाऱ्या चिकनचा आता 10 रुपये किलो दर करूनही कोणी घेईनासे झाल्याचे भयंकर चित्र आहे. आता विविध बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे आणि पिलांना कसे जगवावे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे ही सर्व पिल्ली आता जंगलात सोडून द्यावीत की, काय करावे काही सुचेनासे झाल्याचे पोल्ट्री व्यवसायिक प्रकाश फेगडे यांनी सांगितले. ही पिल्ली लहानाची मोठी करताना खूप खर्च होतो. हा खर्च कोठून निघणार असा प्रश्न त्यांना पडला आहे.
आता मुलांचे शिक्षण कसे करावे, घर खर्च कसा चालवावा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. कोरोनाच्या निव्वळ अफवेमुळे अनेक पोल्ट्री व्यावसायिकांचे असे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - हिंगोलीत विजेचा धक्का लागून विद्यार्थ्याचा मृत्यू; नुकतीच दिली होती बारावीची परीक्षा