हिंगोली - कर्जमाफीची घोषणा होऊन वर्ष उलटले. मात्र, अद्याप हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कमच जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी ऐन पेरणीच्या तोंडावर बँकेच्या पायऱ्या झिजवत आहेत.
वारंवार खेटे घातलेले शेतकरी तर बँकेच्या या फेऱ्यांना एवढे कंटाळून गेलेत की, त्यांना बँकचे अधिकारी साधे बोलू पण देत नसल्याची खंत हिंगोली तालुक्यातील देऊळगाव रामा येथील एका शेतकऱ्याने व्यक्त केली. नेहमीच बँक अधिकारी घराचा रस्ता दाखवत असल्याने कंटाळून शेतकरी म्हणतात, 'कशाची कर्जमाफी अन कशाचं काय'. जो पहावं तो दिवस सारखाच निघतोय. तक्रार करावी तर अग्रणी बँक व्यवस्थापकाचे पद रिक्त असल्याने, शेतकऱ्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
खरीपाची पेरणी तोंडावर येऊन ठेपल्याने पेरणीच्या तयारीसाठी शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने वर्षभरापूर्वी कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला खरा! मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्यांच्या पेरणी काळात चांगलाच कडू अनुभव येत आहे. पीक कर्ज वाटपासंदर्भात सरकार जरी गांभीर्याने घेत असले तरीही त्याचा बँक अधिकाऱ्यावर काहीच परिणाम होत नसल्याचे चित्र शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवरून दिसून येते.
हिंगोली जिल्ह्यात अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकर्याच्या आशा पल्लवीत झाल्यात. शेतकरी कशी तरी पैशांची जुळवाजुळव करून खते बी-बियाणेची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, वारंवार सरकार पीक कर्जाबाबत उजाळा देत असल्याने, बऱ्याच शेतकऱ्यांची आपसूकच पावले ही बँकेकडे वळत आहेत.
बँकेत गेल्यानंतर आपल्या खात्याची चाचपणी केल्यानंतर कर्जमाफी झालीच नसल्याचा शब्द बँक अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांच्या कानी पडत आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे या ठिकाणी पूर्ण अवसानच गळून पडल्यागत होत आहे. पायपीट करून कागदाची जुळवाजुळव करण्यात बरेच दिवस घातले. अन कागदपत्र गोळा करून बँकेत दिले तर नवीनच प्रकार उघड होत आहे.
बँक कर्ज देत नसल्याने शेत पडीक ठेवावे तरी कसे हाच एकमेव उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून, शेतकरी मोठी जोखीम उचलण्याच्या तयारीत आहे. त्यातच काही बँक अधिकारी शेतकऱ्याला साधे बोलू देण्यासही तयार नसल्याने अनेक शेतकरी अग्रणी बँक व्यवस्थापकाकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकाचे पदच महिनाभरापासून रिक्त असल्याने, तक्रारी कराव्यात तरी कोणाकडे ? हा देखील गंभीर प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. अग्रणी बँकेची एकाच कर्मचाऱ्यावर मदार असल्याचे चित्र आहे.