हिंगोली - संपूर्ण राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची दारे बंद करण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असून, रेल्वे व इतर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र सरकारने अद्याप मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यभर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. हिंगोलीतही खटकाळी हनुमान मंदिरासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन करून सहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे कुलूप तोडून दार उघडण्यात आले. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी मंदिर व मंदिर परिसर दणाणून गेला होता.
कोरोनाची आकडेवारी आता आटोक्यात आलेली असताना, सरकार मंदिर बंद ठेवून काय साध्य करीत आहे? असा सवाल देखील आंदोलकांनी केला. यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हनुमान मंदिराचे कुलूप तोडले. दार उघडताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारने दिलेला आदेश मोडल्याने कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - हिंगोली जिल्ह्याला पावसाने दीड तास झोडपले; सेनगाव तालुक्यातील पिके जमीनदोस्त
हेही वाचा - एकाच वेळी नऊ सरकारी विभागांचा पदभार सांभाळणारी धाडसी दुर्गा