हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील कळवाडी येथील सुवर्णा ढाकणे या गरोदर महिलेला रस्त्याअभावी चक्क खाटेवर टाकून ग्रामस्थांनी चिखल तुडवत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्या महिलेने आज कन्यारत्नाला जन्म दिला आहे. तर, त्याच रस्त्याने एका दुसऱ्याही गरोदर महिलेला चिखल तुडवत रुग्णालय गाठण्याची वेळ आली आहे. आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळवाडी गावाला भेट दिली, मात्र, रस्ताच नसल्याने ते देखील गावापर्यंत पोहोचू शकले नाही. परंतु हारवाडी येथून या गावाला पर्यायी व्यवस्था करून देण्याचे त्यांनी सांगितले. एकीला बाजेचा आधार तर, दुसऱ्या महिलेला स्वतः चिखलातून रस्ता काढत जावे लागले.
कळमनुरी तालुक्यातील काळवाडी या गावाला रस्ताच नसल्याने या गावातील ग्रामस्थांचा मोठा वनवास सुरू आहे. दर पावसाळ्यात तर रस्त्याची समस्या अधीकच गंभीर होते. मागील वर्षी आणि यंदाही रस्त्याअभावी गरोदर महिलेला खाटेवर टाकून नंदापूर येथे उभ्या असलेल्या, रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्यात येते. पुरोगामी महाराष्ट्रात ही घटना खरोखरच लाजिरवाणी आहे.
सुवर्णा ढाकणे या महिलेला बाजेवर पोहोचवण्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच रस्त्याने चिखल तुडवत धुरपता पोटे या महिलेला पायपीट करावी लागली. अनेकदा प्रशासनाकडे रस्त्याची मागणी करण्यात आली. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे लक्ष दिले नाही. करवाडीपासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी येत मोर्चा देखील काढला होता. परंतु त्याचादेखील काहीही उपयोग झाला नाही.
एकीकडे वर्षानुवर्षे गावाला रस्ते नाहीत तर, दुसरीकडे मात्र अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री येणार असल्याने रातोरात रस्ता बनवला जातो. मात्र, वर्षानुवर्षे रस्त्याची मागणी केली जाते तरी, देखील रस्ता बनवला जात नाही. परिणामी, चिखल तुडवत दोन गर्भवती महिलांना रुग्णालय गाठावे लागले. एकीला बाजेचा आधार तर, दुसऱ्या महिलेला स्वतः चिखलातून रस्ता काढत जावे लागले.
त्यामुळेच आज जिल्हाधिकारी जयवंशी यांनी करवाडी या गावाला भेट देण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, रस्त्याअभावी जिल्हाधिकारी गावापर्यंत पोहोचू शकले नाहीत. पर्यायी रस्त्याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, सध्या रेल्वे लाईन असल्याने रस्ता पास करण्याचा प्रस्ताव शासनाच्यावतीने पाठवलेला आहे. मंजुरी मिळताच शासनाच्या योजनेतून हा रस्ता बनवित येऊ शकतो.
ग्रामस्थांना अपेक्षित असलेला रस्ता नरेगा अंतर्गत काही प्रमाणात केला देखील, मात्र हा रस्ता शेतकऱ्यांच्या मालकीचा असल्याने ते शेतकरी जमीन देण्यास अजिबात तयार नाहीत. शिवाय नरेगामध्ये भूसंपादनाची तरतूद देखील नसल्याने हा रस्ता बनू शकला नाही. तसेच रस्त्यासाठी खर्चदेखील जास्त लागणार आहे. आशा वेगवेगळ्या बाबी उघड झाल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.