हिंगोली - जिल्ह्यातील वलाना येथील रिक्षाचालक रिसोडमार्गे प्रवासी घेऊन गेला. त्यानंतर त्याने मालेगाव शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. शेषराव जगन्नाथ हेंबाडे (२७) असे मृत चालकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हेंबाडे हे वलाना ते रिसोड या मार्गावर स्वतःच्या रिक्षाने प्रवाशी वाहतूक करत होते. नेहमीप्रमाणे ते रिसोडमार्गे प्रवाशी घेऊन गेले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते गावाकडे परत आले नव्हते. अनेकवेळा अशाप्रकारे त्यांना उशीर होत असल्याने कुटुंबीयांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
दरम्यान, मालेगाव शिवारात त्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली. संपूर्ण गावात या घटनेची माहिती पसरली होती. मात्र, शेषराव यांच्या घरी ही घटना सांगण्याचे कुणाचे धाडस होत नव्हते. त्यानंतर कसे-बसे अपघाताचे कारण सांगत नातेवाईकांना ही घटना सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शेषराव हे शांत स्वभावाचे असल्याने त्यांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली, यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. घटनास्थळी वाशिम ग्रामीण पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवून शवविच्छेदन करण्यात आले आणि प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन केले. शेषराव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई- वडील, आजी असा परिवार आहे.