हिंगोली - आतापर्यंत आपण एटीएम फोडून, तर कधी कटर मशीनने एटीएम कापून पैसे पळवल्याचे ऐकले आहे. मात्र वसमतमध्ये पैसे नव्हे तर चक्क पैशासह एटीएम मशीनच पळवल्याने चोरट्याने पोलीस प्रशासनाला घाम फोडला आहे. परंतु गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरच चोरट्याला पोलिसांनी ताब्यातही घेतले. वसमत येथील मोंढा परिसरातील ही खळबळजनक घटना आहे.
वसमत येथील मोंढा परिसर हा अति वर्दळीचा अन गजबजलेला परिसर आहे. या परिसरात चेपुरवार यांच्या दुकानाजवळ एटीएमचे मिनी पॉईंट आहे. या ठिकाणी पैसे काढण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मात्र मशीनमध्ये असलेले लाखो रुपये लंपास करण्यासाठी चोरांनी हद्दच पूर्ण केली आहे. चोरट्यांनी चोरी करण्यासाठी नवीन शक्कल लढवत चक्क एटीएम मशीनच गायब केली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक उदय खंडेराय व त्यांच्या सहकार्यानी तपास चक्रे गतीने फिरवली. चोरट्यावर गुन्हा दाखल होण्याआधीच जवळपास 25 ते 30 लाख रुपये रोख व मुद्देमालासह एका चोरट्याला जेरबंद केले आहे. पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे. नागरिकांनी चोरट्यांचा चेहरा पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती.