हिंगोली - हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी जाधवांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जाधवांच्या उमेदवारीमुळे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना फटका बसण्याची शक्यता आहे. जाधव यांची मनधरणी करण्यासाठी अर्जुन खोतकर हे वसमतमध्ये दाखल झाले आहेत. जाधव काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या जाधवांचा पक्षाने विचार केला नाही. त्यामुळे जाधवांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांचे देखील जाधवांनी ऐकले नाही. तसेच, हिंगोलीत तळ ठोकून असलेले सेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी देखील शिवाजी जाधवांची मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न केला. आता खुद्द अर्जुन खोतकर हे जाधवांची मनधरणी करण्यासाठी वसमतमध्ये दाखल झाले आहेत.
अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले जाधव यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाजी जाधव निवडणूक रिंगणात राहिले तर काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंना आणि महायुतीच्या हेमंत पाटील यांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे मात्र निश्चित.