हिंगोली - जिल्हा परिषद कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. कार्यालयात अचानक तोडफोड करण्यात आल्याने जिल्हा परिषद परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असताना एक अज्ञात व्यक्ती कार्यालयात घुसला. त्याने कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या या सर्व प्रकाराने कार्यालयातील कर्मचारी गोंधळून गेले.
हेही वाचा - धक्कादायक..! कुटुंबातील १३ जणांच्या जाचाला कंटाळून चिमुकलीसह दाम्पत्याची आत्महत्या
अज्ञात व्यक्ती आपल्यावरही हल्ला करेल या भीतीपोटी कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून बाहेर धाव घेतली. या कार्यालयामध्ये कोणतेही काम वेळेवर होत नसल्याचे अज्ञात व्यक्ती ओरडून सांगत होता. हा सर्व प्रकार कार्यालयात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.