हिंगोली - येथील माळसेलूमधील अंगणवाडीची स्थिती दयनीय झाली आहे. पालक आपल्या चिमुकल्यांना अंगणवाडी शाळेत घेऊन जातात. मात्र, अंगणवाडीची दशा पाहून पालकांचा हिरमोड होत आहे. मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेत ही अंगणवाडी भरवण्यात येत आहे. मात्र, या विद्यार्थांसाठी हक्काची इमारत उभारून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.
हेही वाचा- झोमॅटोची उबेर इट्सवर मात; खरेदी केला भारतामधील संपूर्ण हिस्सा
मालसेलू येथे दहा ते बारा वर्षांपूर्वी अंगणवाडी बांधण्यात आली. मात्र, अर्धवट काम, निकृष्ठ दर्जा यामुळे यात विद्यार्थी बसलेच नाहीत. अंगणवाडीची परिस्थिती पाहून ती उभारलीच कशासाठी? हा प्रश्न पडत आहे. येथील विद्यार्थी दहा ते बारा वर्षांपासून अंगणवाडीच्या मैदानावर धडे गिरवीत आहेत. तीन ते चार वर्षांपासून सार्वजनिक सभागृहाचा आधार घेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
डिजिटल शाळांचा कांगावा शिक्षण विभाग करीत आहे. मात्र, कुठे इमारत नाही, तर कुठे शौचालय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी दैना होत आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 89 अंगणवाडीची संख्या असून, 35 नवीन इमारती प्रस्तावित आहेत. तर 152 अंगणवाडीच्या दुरुस्तीचे प्रस्ताव आलेले असल्याची माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी गणेश वाघ यांनी दिली.