हिंगोली - 'या सरकारला अक्षरशः लोक कंटाळले आहेत. या पाच वर्षात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरी हे सरकार खोटी आश्वासन देणे बंद करेना. वेगवेगळ्या यात्रा काढून भोळ्या-भाबडया जनतेला फसवण्याचे काम सरकार करत आहे. ही सर्व गंभीर परिस्थिती पाहुन या सरकारचं डोस्कं बिस्कं फिरलंय की काय?' असा सवाल अजित पवार यांनी ताकतोडा येथे शिवस्वराज्य यात्रेत सरकारला केला आहे.
कर्ज बाजारीपणाला कंटाळून विक्रीस काढलेल्या ताकतोडा या गावात शिवस्वराज्य यात्रा आज दाखल झाली. यात्रेमध्ये विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे, खासदार अमोल कोल्हे, अजित पवार यांनी सरकारवर प्रखर ताशेरे ओढले.
भाजपने जो काही विकास केला आहे, तो फक्त भाजपच्या पुण्यवान माणसाणांच दिसत असल्याचे स्पष्ट वक्तव्य मुंढे आणि अजित पवार यांनी केले. आमच्या सरकारच्या काळात दर वर्षी 13 हजार पोलीस भरती केली जात होती. या सरकारच्या काळात कामगार कमी करण्याचा कट रचला जात आहे. आता पोलीस भरती घेतली जाईल मात्र, त्यामध्ये ग्रामीण भागातील मुलं लागणार नाहीत, अशी व्यवस्था देखील या सरकारने केली.
कृत्रिम पावसाच्या मुद्द्यावर 'ढगाला कळ ही लागेना अन पाणी बी गळेना' अशी अजीत पवारांनी सरकारची खिल्ली उडवली. आता पुन्हा हे भाजप सरकार येऊन बनवाबनवी करेल. त्यामुळे त्यांच्या खोट्या आश्वासनांना फसू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.